वेळणेश्वर (श्रीदेव महाविष्णू देवस्थान)
घरातून बाहेर पडायचं अचानकच ठरलं. कोणतंच नियोजन नव्हतं. निवासाची बुकींग ना स्थळ दर्शनाचे नियोजन काहीच केलं नव्हतं. वडगाव, कोतोली मार्गे बोरपाडळे येथे प्रा. अविनाश खडके सरांच्या शाळेला भेट दिली. पन्हाळगडाच्या पायथ्याला वळसा घालून मलकापूर मार्गाला गाडी धावत होती. दरम्यान वेळणेश्वरला जायचे ठरले. यापुर्वी जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी, पावस, विजयदूर्ग, कुणकेश्वर, आचरा, मालवण, तारकर्ली, वेंगुर्ला, शिरोड हा संपूर्ण कोकणपट्टा आणि गोवा राज्यातले वागाटोर, म्हापसा पासून कोलवा, मार्गो, बेनाऊलिमपर्यंत सर्व सागर किनारा अनेकवेळा फिरुन झाला होता.
अंबाघाट उतरुन साखरप्याच्यापुढे गाडी वळणे घेत घेत धावत होती. निसर्गाचा सुंदर अविष्कार डोळ्याचे पारणे फेडीत होता. हिरवीगार वनराई आणि आल्हाददायक, ऑक्सीजनयुक्त हवेमुळे फ्रेश वाटत होते. अबलोली ओलांडली आणि आमच्या गुगल महोदयांनी शीरकडे जाण्यासाठी वाकडी वाट दाखवली. अंगावर काटा आणणारी वळणे आणि हृदयात धडकी भरवणारा चढाव मनात प्रचंड भीती घालत होता. गाडी चाळीसच्या पुढे स्पीड घेत नव्हती. कधीकधी दुसऱ्या गेअरवरही चढायचा कंटाळा करीत होती. अनेकवेळा पहिल्या गेअरवरच तिला पळवावे, नव्हे चालवावे लागले.
वळणावळणाचे भीतीदायक रस्ते ओलांडत शेवटी चिपळून रस्त्याला मिळालोत. जीवात जीव आला. गाडीलाही हायसे वाटले असेल. भल्यामोठ्या कमानीतून वेळणेश्वरकडे टर्न घेतला. छोट्या मोठ्या टेकड्यांचाच प्रवास होता. वेळणेश्वच्या टेकडीवरुन काहीच अंदाज येत नव्हता. पश्चिमेचा सूर्य डोळ्यांना त्रास देत होता. एक चांगले वळण घेताच एमटीडीसीच्या रेझॉर्टने आमचे स्वागत केले. तेथील निवासाचा खर्च अधिकच वाटला. तीव्र उताराचा, वळणावळणांचा रस्ता उतरुन गावात प्रवेश होतो. पुढे गेल्यानंतर प्रचंड सागराचे दर्शन झाले. मनातून हुसासा टाकला. पोहचलो एकदाचे असे वाटले. वेळणेश्वर या गावाला सृष्टीचा वरदहस्त लाभलेला आहे. सुमारे बाराशे वर्षांपासून येथे गाव वसलेले आहे.
वेळणेश्वर मंदिरासमोर गाडी लावली. मुक्कामाच्या शोधार्थ पायी भटकंती सुरु झाली. दिवसभर गाडी चालवून पाय दमले होते. चालताना त्यांना आराम मिळत होता. त्यांची आणखी चालण्याची तयारी होती. दोन, तीन ठिकाणं बघितली. पसंत पडली नाहीत. आम्हाला समुद्राच्या सानिध्यात राहायचे होते. शेवटी समुद्र किनाऱ्यावर चहा प्यायचा म्हणून गेलोत. बाजूलाच, सार्थक निवास दिसले. जाऊन बघू या म्हणून तेथे गेलो.
उत्साहाने स्वागत करण्यात आले. निवासाच्या मानाने रेन्ट जरा जास्तच सांगितला. परंतू आम्हाला अपेक्षीत असलेल्या किंमतीत त्याने सहमती दाखवली. राहण्याची आणि जेवणाची सोय झाली. रुमची भलीमोठी काचेची खिडकी उघडली की समुद्राच्या लाटांचा प्रचंड आवाज येत होता. सभोवताली नारळ, पोफळीच्या बागा, सुरक्षीत आणि स्वच्छ समुद्र किनारा. मस्त वाटले. आता येथून दोन दिवस हालायचेच नाही, असे ठरविले आणि गाडीतले सामान रुममध्ये शिफ्ट केले. ¬(अपूर्ण -पुढील भाग )
–विशेष साैजन्य- जेष्ठ पत्रकार, लेखक
– प्रा. डॉ. बाबा बोराडे
चला निसर्ग पाहूयाः भटकंती-रांगड्या मातीतली