दहावीच्या परिक्षेचे चुकीचे वेळापत्रक छापून विद्यार्थींचे न भरुन निघणारे नुकसान करणाऱ्या नवनीत प्रकाशनावर बंदी घालून कडक कारवाई करणेची मागणी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी यांना केली आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक १० वीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. बुधवार दि. ८ मार्च २०२३ रोजी बोर्डाच्या वेळापत्रकानुसार हिंदीचा पेपर होता. मात्र नवनीत प्रकाशनाने दहावी परीक्षेचे वेळापत्रक छापले. परीक्षा बोर्डाने वेळापत्रक बोर्डाच्या संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्ध केले होते. मात्र कोणताही अधिकार नसताना नवनीत प्रकाशनाने दहावीचे वेळापत्रक छापून त्यामध्ये हिंदीच्या पेपरची तारीख दि. ९ मार्च २०२३ रोजी असल्याचे चुकीचे छापले. व ते पत्रक नवनीत प्रकाशनाने प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटल्यामुळे विद्यार्थ्यांनी ते पत्रक आपल्या जवळ ठेवले. व त्यानुसार आपला हिंदीचा पेपर दि. ८ मार्च २०२३ ऐवजी दि. ९ मार्च २०२३ रोजी आहे असे विद्यार्थी व पालकांनी गृहीत धरून ते आपल्या घरी थांबले. त्यामुळे हजारो विद्यार्थी परीक्षेला मुकले असून त्यांच्या भविष्याशी खेळण्याचा घाट नवनीत प्रकाशनाने कशासाठी व का घातला. त्यांना हा अधिकार कोणी दिला. विद्यार्थींचे एक वर्ष वाया घालवून कधीही भरुन न निघणारे नुकसान नवनीत प्रकाशनाने केले आहे. याविरोधात नवनीत प्रकाशनाचा जाहिर निषेध संभाजी ब्रिगेड केला आहे.
या अक्षम्य चुकीबाबत नवनीत प्रकाशनाच्या चौकशीचे आदेश मा. जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमिक शिक्षण विभागाला देवून नवनीत प्रकाशनावर बंदी घालून कडक कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. अन्यथा नवनीत प्रकाशनच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक इंजि. तुषार उमाळे, राज्य सहसंघटक सुयोग औंधकर जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील, कॉग्रेस अल्पसंख्याक उपाध्यक्ष शाकीर तांबोळी, मराठा सेवा संघाचे उमेश कुरळपकर, शिवसेना तालुकाध्यक्ष सागर मलगुंडे, विवेक जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.