डोंगरी साहित्याची चळवळ ही पर्यावरणाची चळवळ झाली पाहिजे
– डाॅ.सदानंद मोरे
शिराळा (जी.जी.पाटील)
डोंगरी साहित्याला फार मोठी परंपरा आहे.डोंगरांमध्ये कोरलेले शिलालेख, लोकसाहित्यातील निसर्गाचे संदर्भ आणि संत तुकारामासह अन्य संतांनी साधना व निर्मितीसाठी डोंगराचा आश्रय घेतला,असे निसर्गाचे महत्त्व आपल्या साहित्य परंपरेमध्ये असल्यामुळे डोंगरी साहित्याची चळवळ ही पर्यावरणाची चळवळ झाली पाहिजे,असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व संत साहित्याचे अभ्यासक डाॅ.सदानंद मोरे यांनी केले.
पणुंब्रेवारूण येथे डोंगरी साहित्य परिषद व शब्दरंग साहित्य मंडळाने आयोजित केलेल्या अकराव्या डोंगरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरुन ते बोलत होते.खासदार धैर्यशील माने,जिल्हा मध्यवर्ती बॅन्केचे संचालक सत्यजित देशमुख,ज्येष्ठ कवी प्रा.प्रदीप पाटील,माजी सभापती,हणमंतराव पाटील, कविसंमेलनाध्यक्ष रघुराज मेटकरी,संयोजक प्रसिद्ध कवी वसंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात डाॅ.मोरे पुढे म्हणाले,संतांनी आपल्या निर्मितीने आणि आचरणाने समाजातील सर्वसामान्य माणसांना दिशा दिली.अंधश्रद्धेवर प्रहार केले.
समाजाव्यवस्थेत एकोपा टिकवून ठेवण्यास हातभार लावला.आजही संतांचे साहित्य समाजाच्या विकासासाठी आदर्शवत आहे.
उदघाटक खासदार धैर्यशील माने म्हणाले, वाचन संस्कृती वाढवायची असेल तर अशी साहित्यसंमेलने झाली पाहिजेत. आज ग्रंथ वाचणारे डोळे मोबाईल, टी व्ही मध्ये गुंतलेले आहेत.ही आजची खंतआहे त्यामुळे ग्रंथालये संग्रहलयात ठेवण्याची वेळ आली वेळ येते की काय अशी भीती व्यक्त केली. मोबाईलच्या दुनियेपेक्षा ग्रंथालयची दुनिया महत्वाची आहे. साहित्याचे वेड लागले तर आयुष्याला आकार येईल.
प्रमुख पाहुणे सत्यजित देशमुख म्हणाले, पालक एकमेकांवर असणारा अपेक्षांचा दबाव/प्रेशर कमी करत नाहीत तोपर्यंत साहित्य संस्कृती खोलवर रुजणार नाही यासाठी संमेलनाची गरज आहे.
राज्य साहित्य संस्कती मंडळाचे सदस्य ज्येष्ठ कवी प्रदीप पाटील यांनी संस्कृतीसह साहित्य परंपरेचे भान येण्याकरिता व उगवत्या प्रतिभावंतांना व्यासपीठ मिळण्याकरिता डोंगरी साहित्य संमेलनाची नितांत आवश्यकता आहे.नवे कवी-लेखक अशा संमेलनांमधूनच घडतात असे सांगितले.डोंगरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी वसंत पाटील म्हणाले ग्रामीण डोंगरी परिसरातील कसदार लेखन करणाऱ्या कवी लेखकांना व्यासपीठ मिळावे ज्येष्ठ लेखक विचारवंताचे विचार मिळावे, वाचन संस्कृती वाढावी यासाठी डोंगरी साहित्य संमेलन आयोजन आहे त्याला पाठबळ मिळण्यासाठी प्रयत्न होणे गरज आहे. स्वागतध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी स्वागत करुन चळवळीची परंपरा सांगितली.
यावेळी संपतरावं देशमुख कवीसंमेलनाध्यक्ष रघुराज मेटकरी उधोजक बळीराम पाटील चरणकर सामाजिक कार्यकर्ते तानाजीराव पाटील प्रसिद्ध कवयित्री मनीषा पाटील, माधुरी मरकड,लेखक डॉ.राजेंद्र माने वामनराव जाधव, सुरेश पाटील सुभाष कवडे उपस्थित होते,
कवयित्री मनीषा पाटील यांनी सूत्रसंचालन तर डोंगरीचे सदस्य प्रतापराव शिंदे यांनी आभार मानले.