विनायक जितकर
कोल्हापुरात टिप्परचालकांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच…
कोल्हापूर – शहरातील कचरा उठावाचे काम करणाऱ्या 169 टिप्परचालकांनी महापालिकेने किमान वेतनची हमी देणारी निविदा प्रसिद्ध करावी या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. गेले अनेक महिने यासाठी पाठपुरावा करून देखील महापालिका प्रशासनाने टाळाटाळ केल्यामुळे टिप्परचालकांना काम बंद आंदोलन पुकारावे लागले. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही चालकांनी काम बंद ठेवले. महापालिकेने पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिका कर्मचाऱ्यांना गाड्या काढायला लावल्या. परंतु सकाळी 169 पैकी फक्त 24 गाड्याच निघू शकल्या.
यादरम्यान आंदोलक टिप्परचालकांनी बाहेर पडत असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना हात जोडून नमस्कार करत आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले. निविदा जाहीर होऊन टिप्परचालकांचे काम सुरु राहावे यासाठी आप पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुट्टीचे कारण देत याविषयी मंगळवारी निर्णय होईल असे सांगण्यात आले. यामुळे काम बंद आंदोलन दुसऱ्यादिवशीही सुरूच राहिले.
महापालिकेच्या वतीने पर्यायी यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्यात त्यांना अपयश आले. काम बंद झाल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत आहे याची जाणीव असल्यानेच टिप्परचालक फक्त निविदा प्रसिद्ध करण्याचीच मागणी करत आहेत जेणेकरून किमान वेतन देण्याची प्रक्रिया सुरु होईल. महापालिकेने निविदा प्रसिद्ध करावी, लगेच काम सुरु करू, प्रसंगी जादा काम करून मागील बॅकलॉग भरू अशी भूमिका टिप्परचालकांची असल्याचे आप कार्याध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, दुष्यन्त माने, संजय राऊत, कुमार साठे, युवराज कवाळे, जयसिंग चौघुले, सागर व्हलार, बाजीराव गवळी, संजय नलवडे, उमेश वडर, शशांक लोखंडे आदी उपस्थित होते.