आमदार ऋतुराज पाटील यांची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी…
कोल्हापूर – जिल्ह्यातील विविध अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज सादर केलेले आहेत. पण दाखले वेळेत उपलब्ध होत नसल्याने प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. याचा पालक आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे. दाखले वेळेत मिळाले नाहीत तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारे विविध शासकीय दाखले लवकरात लवकर उपलब्ध द्यावेत अशी मागणी आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 10 वी व 12 वी बोर्डाचे निकाल जाहीर झालेले आहेत. सद्या पुढील शिक्षणासाठीची प्रवेश प्रक्रीया सुरु आहे. सदर प्रवेशाकरीता विद्यार्थ्यांना रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलिअर, अल्प भूधारक, अशा अनेक शासकीय दाखल्यांची आवश्यकता असते. सदर दाखल्यांकरीता विद्यार्थ्यांनी महा ई सेवा व आपले सरकार केंद्रांच्या माध्यमातून तहसिलदार आणि प्रांत कार्यालयाकडे अर्ज केलेले आहेत. दाखल्यांची ही प्रक्रिया महा -आयटी या एकाच सर्व्हरच्या माध्यमातून होते. त्याचबरोबर या सर्व्हरवर दाखल्यांखेरीज प्रवेश प्रक्रीया, रेशनकार्ड विभागातील सर्व प्रकारची चलने, अशी इतरही शासकीय कामे केली जातात. त्यामुळे हा सर्व्हर सतत डाऊन होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे दाखले मिळण्यास विलंब होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातील विविध कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज सादर केलेले असून प्रवेश प्रक्रीया सुरु आहे. सदर दाखले वेळेत उपलब्ध होत नसल्याने प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत असून याचा पालक आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे. दाखले वेळेत मिळाले नाहीत तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारे विविध शासकीय दाखले त्वरीत उपलब्ध होणेकरीता आपल्या स्तरावरुन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य ते निर्देश देवून सहकार्य करावे, अशी मागणी केली आहे.