एसटी कर्मचाऱ्यांची पी. एफ. व ग्र्याजुटीची ८०० कोटी रुपयांची रक्कम थकली
श्रीरंग बरगे यांचा आरोप
कोल्हापूर:एसटी कर्मचाऱ्यांचा हल्ली जो संप झाला होता त्या काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी चार वर्षे निधी देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या त्रि सदस्यीय समितीने सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते. पण गेले अकरा महिने सरकारकडून अपुरा निधी येत असल्याने एसटी बँक, भविष्य निर्वाह निधी, व उपदान अशी मिळून कर्मचाऱ्यांची ९६० कोटी रुपयांची देणी थकली असून मध्यंतरी सरकारने एसटीकडे जमा खर्चाचा तपशील मागितला होता, तो एसटीने दिला असून अकरा महिन्याच्या कालावधीत साधारण १६०० कोटी रुपयांची तूट असल्याचे सरकारला कळविले आहे. मात्र ही तफावत रक्कम अजूनही मिळालेली नाही.मदतीची परिपत्रके काढली जात असून प्रत्यक्षात मात्र निधी दिला जात नाही. त्या मुळे एसटीला मदत करीत असल्याचा सरकारचा दावा खोटा व दिशाभूल करणारा असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.बरगे हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी ही माहिती पत्रकारांना दिली आहे.
बरगे पुढे म्हणाले की, काेरोना व संपामुळे एसटीचे उत्पन्न कमी झाले. कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाच्या वसुलीची एसटी को -ऑफ बँकेची अंदाजे १६० कोटी रुपये इतकी रक्कम महामंडळाने बँकेकडे डिसेंबर २२ पासून भरणा केलेली नाही. त्याचा फटका माेठ्या प्रमाणात बँकेला बसत आहे. हीच रक्कम बँकेने गुंतवली असती तर त्यावर अंदाजे एक कोटी पंचाहत्तर लाख रुपये पेक्षा जास्त व्याज बँकेला मिळाले असते. पण तसे न घडल्यामुळे ते पैसे बुडाले असून त्याची झळ बँकेला सोसावी लागली आहे. त्याच प्रमाणे भविष्य निर्वाह निधी व उपदान या दोन्ही रक्कमांचा एसटी कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र ट्रस्ट असून वेतनातून कपात केलेल्या पी.एफ. व ग्र्याजुटीच्या रक्कमेचा हिस्सा एसटीने या ट्रस्टकडे भरणा केलेला नाही.
श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस टी कर्मचारी कॉंग्रेस. |
सरकारच्या एसटी व कर्मचाऱ्यांसंदर्भातील घोषणा वेगवान व गतिमान दिसत असल्या तरी मदत मात्र संथ गतीने होत असल्याने त्याचा परिणाम एसटीच्या एकंदर कामकाजावर झाला आहे. त्यामुळे महिन्याला येणारी तूट भरून काढण्यासाठी तफावतीची रक्कम सरकारने तात्काळ दिली पाहिजे अशी मागणीही बरगे यांनी केली आहे,
एसटीच्या योजनेचा धसका; खासगी ट्रॅव्हल्सही तिकिटाबाबत प्रवाशांना खूशखबर देणार