हातातून पक्ष,चिन्ह व नाव गेलं. गेल्या पन्नासहून वर्ष ज्या ठाकरे नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण फिरत होतं, त्यामुळे अनेक वादळे तयार होत होती, त्या ठाकरे घराण्याचा आपल्या पक्षाचा राजकीय पटलावरील स्वतःचा हक्क, जहागिरदारी आतातरी संपलीय व ही वस्तुस्थिती उध्दव ठाकरे व त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांनी स्विकारावीच लागेल. ठाकरे व शिवसेना हे विभक्त होवू शकत नाही, हा झाला भावनिक मुद्दा. पण सारे राजकारण केवळ भावनेवर चालत नाही, काही गोष्टी तांत्रिक व कायद्याच्या चौकटीतच बसवून कराव्या लागतात. नाईलाजाने त्यांनी केल्या,अर्थात भारतातल्या पक्षातंर्गत काही वेगळी परिस्थिती नाही. पण जेव्हा भाजपाशी उभा पंगा घेतल्यानंतर खरं तरं ठाकरे यांनी सावध व्हायला हवे होते. किमान कागदोपत्री तरी हिसाब- किताब नीट ठेवला पाहिजे होता. तो नव्हता म्हणून नियमानुसार संसदीय पातळीवर व संघटनात्मक आराखड्यात ठाकरे गट कसा व किती कमी आहे हे निवडणूक आयोगाने दाखवून दिले व पक्ष व चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे यांना दिले. याचे केवळ राजकीय नाहीतर सामाजिक परिणाम मोठे होणार आहेत. ते पाहण्याआधी काही योगायोग तपासावे लागतील. सर्वोच्य न्यायालयात सर्वोच्च सुनावणी नुकतीच संपली व त्याचा एकूणच प्रभाव महाराष्टूात असताना, अचानक निवडणूक आयोगाने हा निर्णय घोषीत करुन सुनामी आणली. या गोष्टीचा विचार करायला हवा.
उध्दव ठाकरेंकडे या क्षणाला ठाकरे हे नाव वगळता काहीही नाही, पण त्यांना कदाचित या निकालाच्या विरोधात सहानुभूती मिळू शकते, व ती सहानुभूतीची लाट तयार करायला व तिचे त्सुनामीत रुपांतर करायला आता मातोश्रीत बसून चालणार नाही. त्यांना महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल. फत्त मिडीयासमोर येवून एकनाथ शिंदेसह बाकी आमदार व खासदारांना शेलक्या भाषेत बोलून वा शिव्या देवून हा पक्ष पुन्हा उभा राहणार नाही. एकनाथ शिंदे यांचे गेल्या सहा महिन्यातील काम, त्यांचे कार्यकर्त्यांतील मिसळणे व भेटणे आणि कामाचा निपटारा या गोष्टी नजरेआड करुन चालणार नाही. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी त्यांच्यावर तोंडसुख घेण्याचेक्षा रणणिती ठरवावी, नियोजन करावे व त्यासाठी बाहेर पडावे. दौरा फास्ट फारवर्ड न करता आपल्याला लोकांना ठाकरे हाच शिवसेनेचा ब्रँड कसा आहे हे पटवून द्यावे लागेल व लोकांना आपलेसे वाटेल असं वागायला लागेल. मुंबई महानगरपालीका निवडणूक ही ठाकरे गटासाठी लिटमस टेस्ट आहे. करो वा मरो अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ज्या आपल्या आघाडीच्या पक्षासाठी स्वतःचा पक्ष हातातून घालवून बसलेल्या ठाकरे यांना प्रामाणिक मदत करण्याची हीच वेळ आहे हे शरद पवार यांनी जाणले तरी खूप आहे व काँग्रेसचा हाथ किती घट्ट राहतो हेही तपासायची वेळ आलीय.
मुंबईतल्या उरल्या सुरल्या मराठी टक्क्याला ठाकरे ब्रँड एकेकाळी मोठा आधार होता व ठाकरेंना याच मराठी माणसाने मुंबईत जीवाची बाजी लावून ताकद दिली आहे. राजकारणापलीकडे जावून सामाजिक मुद्दा आहे तो ठाकरे यांनी राजकीय न करता आता तरी त्यांना जवळ करावे, कारण बाळासाहेबांनी शिवसेना मराठी माणसासाठी स्थापन केली होती, पण शिवसेनेने याच मराठी माणसाला गेल्या २५ वर्षात फोलफाट्यासारखा बाजूला केला. आज हे ठाकरे पक्षातून नो व्हेअर झाल्यानंतर गर्व से कहो म्हणायला कोणी आले नाही, तर मातोश्रीच्या दरवाजावर मराठी माणूसच आलाय याची जाण आता ठेवली पाहिजे.अनेक धोरणात्मक विषयांवर धरसोड वृत्तीही उध्दव ठाकरे यांना भोवले आहे. कोकणात येणाऱ्या अनेक प्रकल्पाबाबत ठाम भूमिका नसल्याने सर्वांचेच नुकसान झाले आहे. ठाकरे यांचे कोव्हीड काळात कौतुक झाले तरी हाच काळ त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी घातक सिध्द झालाय. फेसबुकवरून लाईव्ह येणारे ठाकरे, लोकांत मिसळणे फार दूरची गोष्ट पण मंत्रालयातही आले नाहीत. ही कसर अजित पवार यांनी भरुन काढली. राष्ट्रवादीसाठी हा काळ फार भारी होता. आपलाच मुख्यमंत्री आपल्यालाच भेटत नाही,भेट देत नाही यापेक्षा सल आणि वेदना दूसरी नव्हती. पण यात एका व्यक्तीचा मोठा आधार होता व तो म्हणजे एकनाथ शिंदे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता एकाच रात्रीत वाढलेली नाही, हेही ठाकरे यांनी अभ्यासले पाहिजे. त्यांनी आपल्या सहकारी आमदारांना जो आधार दिला तो मातोश्रीच्या सावलीपेक्षा फारच सुखावह होता, म्हणूनच चाळीसपेक्षा जास्त आमदार व पंधरा खासदार मोठ्या संख्या ने राजकीय रिस्क घेवून जातात त्यावेळी काहीतरी गणित चूकतेय याचा अभ्यास ठाकरेंनी करावा. खरं तर उध्दव ठाकरेंनी आता थेट महाराष्ट्रातील सर्वसामान्यात जावून बोलायला हवं. हा उरलासुरला पक्ष प्रवक्त्यांचा झालाय, त्यांची तोंडं सध्यातरी बंद केली तर काही प्रमाणात डॅमेज कंट्रोल होईल. खास करून संजय राऊत या व्यक्तीला या अत्यंत संवेदनशील व अस्तित्वाचाच निकालाच्या काळात तोंड आवरायला सांगीतले व स्वतः ठाकरे मनमोकळपणाने बोलते झाले तर काहीतरी बदल होईल.एकनाथ शिंदेपेक्षा संजय राऊत यांनी ठाकरे व पक्षाला राजकीय अडचणीत आणले आहे. वास्तवाला धरून नसलेल्या वल्गना,च्या आपल्या साथीदारांबद्दल अपशब्द, शिविगाळ व आरोप यातून प्रचंड तणाव निर्माण झाला.संवादाचे धागे तुटले. त्यामुळे आता ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला बाळासाहेबांचा सुपूत्र म्हणून भावनिक साद घातली पाहिजे. आता एकनाथ शिंदें या विषयापलीकडे जावून बोलले पाहिजे.कारण सर्वोच्य न्यायालयाचा निकाल सर्वच मुद्यांवर येईपर्यंत शिवसेना हा सर्वच गोष्टींनी एकनाथ शिंदे यांचा आहे ही वस्तुस्थिती स्वीकारून पूढचे नियोजन केले पाहिजे.
अजूनही उध्दव ठाकरे यांच्याकडे मोठे ट्रम्प कार्ड आहे, ते म्हणजे त्यांनी केवळ बाळासाहेबांचा सुपूत्र म्हणूनच लोकांसमोर जायला हवे व एकच प्रश्नावर लोकांना बोलते केले पाहिजे की, बाळासाहेबांची शिवसेना, त्याच्या सुपूत्राशिवाय तुम्हाला मान्य आहे का? इथेच खरा कौल मिळेल. कारण ही लढाई तेवढी सोपी नाही.सर्वोच्य न्यायालयात काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे पुन्हा १९६६ चे साल आणायचे असेल तर तोच डोक्याला भगवा फडका बांधून, हातात फक्त वडापाव घेवून बेंबीच्या देठापासून | ‘शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशा घोषणा देत संघटनेला स्वतःचे रक्त सांडून,घाम गाळून वाढवली त्या शिवसैनिकाला शोधायचे आहे, कारण तोच खरा पुन्हा एकदा नव्या वाटचालीचा ब्रँड अॅम्बेसेडर बनणार आहे, तोच तुम्हाला तारणार आहे. राऊतांसारखे मफलर उडवणारे ते शिवसैनिक नाहीत. मुळात आता कार्यकर्त्याना,पक्षाला व स्वतःला काय राजकीय ओळख द्यायची इथपासून सुरवात आहे. तत्कालीन आघाडी सरकारचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, आम्ही उध्दव ठाकरे यांना चार वेळा गुप्तचर विभागाचा काहीतरी गडबड होणार आहे, याचा अलर्ट दिला होता. तरीही त्यांनी गांभीर्याने घेतले नव्हते. कदाचित ठाकरे यांनी शिंदे व इतर मंत्र्यांना फार काही करतील अशी हिंमत नाही असे समजून गृहीत धरले असावे, ज्यामुळे आज ठाकरे एकिकडे व पक्ष दुसरीकडे असे झाले. त्यामुळे आता ठाकरे यांना आपली नवी जागा व ओळख करायची आहे.
एकूण गेल्या ५५ वर्षाच्या काळात शिवसेनेची तीन शकले झाली. राज ठाकरे यांनी अर्धी सेना नेली. आता शिंदे यांनी बहुतांशी नेली व उरलेली ठाकरे यांच्याकडे आहे. शिवसेनेची असे तुकडे होण्याचे एकच मुख्य़ कारण होते ते म्हणजे, नेतृत्वावरच नाराजी. काही ठराविक अवतीभोवतीचे सोडल्यास पक्षात बाकीच्यांना फारशी किंमत नव्हती. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात दबलेला आवाज आता बाहेर पडतो आहे.पण आताची ठाकरे गटाची ही (शिवसेना नव्हे ) मोठी वाताहात झालीय. याहून ती होणार नाही. रक्तबंबाळ, व नाकातोंडात माती गेलेला मल्ल कसा पडतो तशी अवस्था झालीय. मुळ पिंडांच्या शिवसैनिकाला ती न पाहवणारी नाही.यातून पुन्हा उभे राहण्यासाठी कोट्यावधी रुपयांच्या मर्सिडीज बेंझचा प्रवास टाळून एक सामान्य शिवसैनिक म्हणून उध्दव ठाकरे यांनी आपली महाष्ट्रातील सैनिक जोडो यात्रा सुरू करावी, मातोश्रीचे गेट सताड उघड़े ठेवावे, कोणालाही कधीही भेटता येईल अशी व्यवस्था करावी, बडवे बाजूला केल्यास शिवसेनाप्रमुखांच्या या सुपुत्राला ज्येष्ट कार्यकर्ताचे आर्शीवाद, तरुणांची साथ मिळेल. दिवस-रात्र ही मेहनत करावी लागेल, आता फेसबुक लाईव्ह बंद करून फेस दाखवून आपण किती लाईव्ह आहोत, हे दाखवावे. शि व से ना हा चार अक्षरे म्हणजे बेअरर चेक आहे, ज्याच्या मनगटात धमक आहे त्यांनी तो वटवावा असं म्हणतात. आता बेअरर चेक परत आणण्यासाठी मनगटातील धमक बाहेर पडून दाखवावी लागेल ना? ..
साैजन्यः अग्रलेख ॥ कोकण एक्सप्रेस
संपादक ॥ सतीश कदम ( 9860403311)