निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे – फडणवीस सरकारला शेतकऱ्यांची आठवण.
मुंबई – केंद्रातील भाजपा सरकार असो वा राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार दोन्हीही शेतकरी विरोधी आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीची घोषणा विधानसभेत करुनही अजून शेतकऱ्यांना ती मिळालेली नाही. राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर शेतकरी महासन्मान निधीच्या नावाखाली तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा डाव आहे परंतु शिंदे फडणवीस सरकारच्या या षडयंत्राला शेतकरी बळी पडणार नाहीत. खते, बि-बियाणे, शेती साहित्यावर जीएसटी लावून शेतकऱ्यांची लूट सुरु आहे. सरकारला जर शेतकऱ्यांना खरेच मदत करायची असेल तर त्यांनी कृषी साहित्यावरील जीएसटीतून होत असलेली शेतकऱ्यांची लूट थांबवावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, शेतकरी महासन्मान योजना ही फसवी आहे. महागाईमुळे शेती करणे परवडत नाही. शेतमालाला भाव मिळत नाही, शेतकरी आपला शेतमाल रस्त्यावर फेकून देत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, हमी भाव देणार या वल्गना हवेत विरल्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल तीव्र संताप आहे.
नुकसानभरपाई जाहीर करूनही ती अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. भाजपाप्रणित शिंदे सरकार केवळ घोषणा करत आहे. शेतकऱ्यांकडून १०० रुपये लुटायचे आणि १ रुपयाची मदत द्यायची ही बनियावृत्ती आहे. निवडणुका डोळ्यासमोर असल्याने त्यांना शेतकऱ्यांची आठवण झाली आहे पण शेतकऱ्यांवर या तुटपुंज्या मदतीचा काहीही परिणाम होणार नाही.