‘शासन आपल्या दारी’ अभियानाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात…
कोल्हापूर : शासन आपल्या दारी अभियानांतर्गत जिल्ह्यातील पात्र सर्व लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्या, अशा सूचना करुन यासाठी आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.
‘शासन आपल्या दारी’ अभियानाची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आली. यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. |
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, नागरिकांच्या कल्याणासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबवण्यात येत आहेत. कन्या माझी भाग्यश्री, विविध आवास योजनांसह अन्य योजनांचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्याला मिळवून देण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करुन लाभार्थ्यांची माहिती घ्या. यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घ्या. अधिकाधिक नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी व्यापक प्रसिद्धी करा, असे त्यांनी सांगितले.
ग्रामविकास, प्राथमिक, माध्यमिक, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महिला व बाल विकास, सामाजिक न्याय, कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, ऊर्जा, सहकार, मत्स्य व्यवसाय विभाग, जिल्हा अग्रणी बँक, विविध महामंडळे आदी विविध विभागांच्या शासकीय योजना, आतापर्यंत देण्यात आलेला लाभ व उर्वरित लाभार्थी आदी विषयांचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी घेतला. जिल्ह्यातील सर्व कामगारांची नोंदणी करुन घेऊन त्यांना योजनांचा लाभ द्या, असे सांगून त्या त्या योजनांचे नाव व आतापर्यंत देण्यात आलेल्या लाभाची अद्ययावत माहिती विहीत नमुन्यात सादर करा, अशा सूचना त्यांनी विभाग प्रमुखांना दिल्या.