विनायक जितकर
मा. चेअरमन विश्वास पाटील यांचा सत्कारप्रसंगी पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. यु.व्ही. मोगले, संचालक युवराज पाटील, संकलन व्यवस्थापक एस.व्ही. तुरंबेकर, बी.आर. पाटील, डॉ. मगरे, सुनील पाटील, अविनाश गुरव, अधिकारी व कर्मचारी…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या, कोल्हापूर. कर्मचाऱ्यांच्या वतीने चेअरमनसो यांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेचा मिलाफ यामुळे साऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद, अक्षय तृतीयेच्या दिनी विक्रीचा नवा उच्चांक केला. शनिवारी (२२ एप्रिल) दिवसभर २० लाख ७० हजार लिटर दुधाची विक्री झाली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील एका दिवसात झालेली सर्वाधिक दूध विक्री आहे. या रेकॉर्ड ब्रेक दूध विक्री निमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांच्या वतीने संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तर चेअरमन पाटील यांनी गोकुळ दूध उत्पादक व ग्राहक यांच्या विश्वासार्हतेच्या बळावर २० लाख लिटर दूध संकलनाचे ध्येय निश्चितच साध्य करू असा विश्वास व्यक्त केला.
गोकुळने उत्पादक व ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ करून देण्यासाठी नेहमीच प्राधान्यक्रम आहे. याचे फलित म्हणजेच गोकुळच्या दररोजच्या दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी रमजान ईद, अक्षय तृतीया या दिवशी गोकुळच्या इतिहासातील एका दिवसाच्या दूध विक्रीचा नविन उच्चांक प्रस्थापित झाला. रमजान ईद हा मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण असून या दिवशी दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी असते यामुळे २० लाख ७० हजार १४० लिटर्स इतकी उच्चांकी दूध विक्री एक दिवसात झाली.गेल्यावर्षी रमजान ईदला २० लाख लिटर्स दूध विक्री झाली होती. यंदा त्यामध्ये ७० हजार लिटरची वाढ झाली आहे.
यानिमित्त ताराबाई पार्कमधील गोकुळच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन चेअरमन पाटील यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना चेअरमन विश्वास पाटील म्हणाले, गोकुळने दूध विक्रीमध्ये नविन मानदंड निर्माण केला. गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे. गोकुळने दिवसाला २० लाख लिटर्स दूध संकलन व तितकीच विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले असून हे उद्दिष्ट गोकुळ दूध उत्पादक व ग्राहकांच्या विश्वासहार्ततेवर साध्य करू. या यशामध्ये गोकुळचे दूध उत्पादक, ग्राहक वितरक, दुधसंस्था, कर्मचारी अधिकारी व वाहतूक ठेकेदारांचे योगदान मोलाचे आहे. यामुळे ही सर्व मंडळी कौतुकास पात्र आहेत. म्हणून मी त्यांना संचालक मंडळाच्यावतीने धन्यवाद देतो. “असे चेअरमन पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच रमजान ईद, अक्षय्य तृतीय, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक, वितरक, व संघाचे अधिकारी – कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वागत व प्रास्ताविक एम. पी. पाटील यांनी केले अशोक पुणेकर यांनीआभार मानले.
यावेळी चेअरमन विश्वास पाटील,संचालक युवराज पाटील, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. यु. व्ही. मोगले, संकलन व्यवस्थापक एस. व्ही. तुरंबेकर, बी. आर. पाटील, डॉ.मगरे, सुनील पाटील, अविनाश गुरव, अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.