विनायक जितकर
अवघ्या १ वर्षांत १०,५०० हुन अधिक रुग्णांना ८६ कोटी ४९ लाखांची मदत वितरित मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची संवेदनशीलता…
मुंबई – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे. गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जाते. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या १ वर्षांत कक्षाकडून १०,५०० पेक्षा अधिक गोरगरीब – गरजू रुग्णांना एकूण ८६ कोटी ४९ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे.
एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरू केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश नरसिंह चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या कक्षाची जबाबदारी दिली होती. |
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी पहिल्याच जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर महिन्यात ३३६ रुग्णांना १ कोटी ९३ लाख, ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०६० रुग्णांना ८ कोटी ८९ लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्येज १२३७ रुग्णांना १० कोटी २७ लाख, मार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९५ लाख, एप्रिल मध्ये १९८४ रुग्णांना ९ कोटी ९३ लाख, मे मध्ये १३२९ रुग्णांना ११ कोटी २५ लाख, तर जून मध्ये विक्रमी ९४२ रुग्णांना १४ कोटी ८१ लाख, रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.
संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीन मध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी केले आहे.