लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व : शाहू मिलमधील कार्यक्रम व प्रदर्शनाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व 2023 निमित्त शाहू मिलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांना उपस्थित रहावे तसेच या ठिकाणी आयोजित विविध उत्पादनांच्या प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. रविवार दिनांक 7 मे रोजी शाहू मिल येथे सकाळी 9.30 वाजता ते सायंकाळी 5 या वेळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना कोल्हापुरातील मान्यवर चित्र शिल्पकारांकडून कलेच्या माध्यमातून मानवंदना देण्यात येणार आहे. तर दुपारी 2 वाजता “माणूस” 1939 हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता “भूपाळी ते भैरवी” महाराष्ट्राचा लोकजागर हा कार्यक्रम सादर होणार आहे.
सोमवार दिनांक 8 मे रोजी शाहू मिल येथे सकाळी 10.30 ते 12.30 या वेळेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य राजेंद्र हंक्कारे यांची कॅलिग्रॅफी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तर दुपारी 2 वाजता “ध्यासपर्व” 2001 हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता राजर्षी शाहू महाराजांना शाहीरी मुजरा (शाहिरी पोवाडा) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या बरोबरच शाहू छत्रपती मिल येथे 14 मे पर्यंत ग्रंथ प्रदर्शन, दुर्मिळ शस्त्रास्त्रे, शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे, रोबोटिक साहित्यांचे तसेच जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती देणारे चित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. तसेच विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने गूळ, कापड, चप्पल, माती व बांबूच्या वस्तू, घोंगडी, खाद्य पदार्थ, तांदूळ, मिरची, मध, भडंग, हस्तकला, ठिकपूर्लीची बर्फी, बचत गट उत्पादने, आजरा घनसाळ तांदुळ, काजू, रेशीम, तृणधान्य व वन उत्पादने आणि आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले आहे.