प्रधान सचिव विकास खारगे यांच्याकडून कणेरी मठ येथील पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रम स्थळाची पाहणी
कोल्हापूर: पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी कणेरी मठ येथे होणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी होणारे नागरिक पर्यावरण रक्षणासाठी कृतिशील बनतील, असा विश्वास मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी व्यक्त केला.
श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने पर्यावरण रक्षणाचा जागर होण्यासाठी घेण्यात येणारा हा लोकोत्सव यशस्वी होण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी कृषी, वन, पर्यावरण, महसूल, ग्रामविकास, जलसंपदा, सांस्कृतिक विभागासह विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. पंचमहाभूतांच्या संरक्षणाचे महत्व नागरिकांना लक्षात येत असल्यामुळे सर्व घटकांचे सहकार्य यासाठी मिळत आहे. या महोत्सवात पर्यावरण रक्षण व संवर्धनाची जनजागृती करण्यात येणार असून यात कोल्हापूर जिल्ह्यासह जगभरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खारगे यांनी केले.
श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच या ठिकाणी उभारण्यात आलेली गोशाला, गुरुकुल शिक्षण पद्धती, कृषी विज्ञान केंद्र, हॉस्पिटल सह संस्थानच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या महोत्सवात शासनाच्या विविध विभागांच्या महत्वपूर्ण लोककल्याणकारी योजनांची माहिती देणारे तसेच महिला बचत गटांचेही स्टॉल उभारले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
कणेरी मठ येथे सिद्धगिरी संस्थानच्यावतीने सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवांतर्गत उभारण्यात आलेल्या विविध दालनांना. खारगे यांनी भेट देऊन कार्यक्रमाच्या तयारीची माहिती घेतली. तसेच सेंद्रिय शेतीची पाहणी करुन अशा पद्धतीची शेती अधिकाधिक शेतकऱ्यांनी करण्यासाठी प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा केली. यावेळी श्री काडसिध्देश्वर स्वामीजी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, मठाचे विश्वस्त उदय सावंत व अन्य मान्यवर उपस्थित होते.