संदीप इंगळे- शिराेळ
हेरवाड गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करत एक ऐतिहासिक पाऊल उचलल्याबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने माजी सरपंच सुरगोंडा पाटील व सर्व माजी सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी पी.आर.कोळेकर यांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे. हा कार्यक्रम २५ जानेवारी रोजी मुंबई येथे होणार आहे.
राजकारण,समाजकारण आणि प्रशासन अशा क्षेत्रात महिलांसाठी भरीव कार्य करणा-या व्यक्तींचा यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.हेरवाड गावामध्ये माजी सरपंच सुरगोंडा पाटील, ग्रामविकास अधिकारी पी.आर.कोळेकर व सर्व तत्कालीन सदस्यांनी विधवा प्रथा बंद करणेबाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर करत एक ऐतिहासिक पाऊल उचलले होते.याची दखल थेट राज्य सरकारला घ्यावी लागली होती व महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.
या महत्त्वपूर्ण निर्णययाबद्दल संपूर्ण हेरवाड गांवचे नाव सर्वदूर पोहोचले.याचीच दखल घेऊन आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने त्यांच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त माजी सरपंच सुरगोंडा पाटील व सर्व माजी सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी पी.आर. कोळेकर यांना हा मानाचा पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
असेच निर्णय अन्य गावांनीही विनाविलंब घेणे काळाची गरज- POSITIVVE WATCH