राज्यातील जनतेला न्याय देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर :
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पामुळे गेल्या काही वर्षात कोरोना सारख्या स्थितीत राज्याच्या विकासात असणारी संथगती दूर होवून राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहेच. यासह शेतकरी, महिला, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांच्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या योजनांमुळे राज्यातील जनतेला न्याय देणारा सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले कि, शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा, पर्यावरणपूरक विकास या पंचामृत ध्येयावर देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवातील राज्याचा पहिला आणि प्रगतीचा आलेख उंचावणारा सर्वसामान्यांचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी बांधवासाठी प्रधानमंत्री कृषी योजनेत राज्य सरकारकडून प्रतिवर्ष रु.६००० ची वाढ, केवळ १ रुपयात पिकविमा, शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्यांना योजनेचे लाभ, १२.८४ लाख पात्र शेतकर्यांच्या खात्यात ४६८३कोटी रुपये थेट जमा, यासह आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण, गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत लाभही २ लाखांपर्यंत आदी शेती विषयक भरघोस तरतुदीमुळे शेतीप्रधान कामांना चालना मिळून शेतकऱ्यांचे हित जपले जाणार आहे. सरसकट महिलांसाठी एस.टी.प्रवासात ५० टक्के सूट, मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना, आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात भरीव वाढ, नोकरदार महिलांसाठी शहरी भागात ५० वसतिगृहे, सीमावर्ती भागातील गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यासाठी योजना, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीत मोठी वाढ, गणवेशही मोफत यासह आरोग्य, पर्यटन, दळणवळण, शिक्षण, सर्वच समावेशक बाबींची अर्थसंकल्पात बारकाईने दखल घेण्यात आली आहे.
कोल्हापूरचा विचार करता श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरणासाठी ५० कोटी रुपये, कोल्हापूर चित्रनगरी येथे आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी ११५ कोटी रुपये, कोल्हापुरात अत्याधुनिक मनोरुग्णालयाची उभारणी, महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गाची निर्मिती यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश असल्याने जिल्ह्याच्या विकासालाही चालना मिळणार आहे. यासह ऐतिहासिक गडकोट किल्ले, स्मारक संवर्धनासाठी ठोस निधीची तरतूद, मराठी भाषेच्या संशोधन, संवर्धनाकरिता योजना आदी महत्वाच्या बाबींसह रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीवरही या अर्थसंकल्पाद्वारे भर देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला न्याय देणारा सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.