समाजातील सर्व घटकांचे प्रश्न तात्काळ निकाली काढण्याच्या हेतूने ‘शासन आपल्या दारी’
कोल्हापूर – राज्य शासनाच्या वतीने सर्वसामान्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. या योजनांची गतीने अंमलबजावणी करुन समाजातील सर्व घटकांचे प्रश्न तात्काळ निकाली काढण्याच्या हेतूने ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने गावनिहाय नियोजन करुन जिल्ह्यातील 30 हजार 500 लाभार्थ्यांना आजवर लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात एकुण 75 प्राथमिक आरोग्य केंद्रे असून 413 आरोग्य उपकेंद्रे आहेत. या सर्व केंद्रांमध्ये आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट कार्ड, आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (ABPMJAY), जननी सुरक्षा योजना, निक्षय पोषण योजना DBT, पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया या योजनांतंर्गत नागरिकांना लाभ देण्यात येत आहे.
आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट कार्ड – जिल्ह्यातील 2 हजार 713 लाभार्थ्यांना या योजनेचे कार्ड देण्यात आले आहे. या योजनेद्वारे लाभार्थ्यांची आरोग्य विषयक माहिती एकत्रीत करण्यात येत असून त्याद्वारे त्यांच्यावर उपचार करणे सोयीचे होत आहे.
आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PMJAY) अंतर्गत 21 हजार 103 लाभार्थ्यांना लाभ दिला असून कुटुंबांतील एका किंवा सर्व सदस्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. पॉलिसी वर्षात कुटुंबांतील एक किंवा सर्व सदस्य प्रति वर्ष 5 लाख रुपयांपर्यंतच्या रुग्णालयीन खर्चाचा लाभ घेवू शकतात. या योजनेंतर्गत 1 हजार 209 शस्त्रक्रिया, चिकित्सा, उपचार ( महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील 996 उपचार + अतिरिक्त 213 उपचार) उपचारांचा समावेश असून आरोग्य योजनेमध्ये 996 शस्त्रक्रिया, चिकित्सा, उपचार आणि 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवांचा (महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील 183 + 121 सेवा + अतिरिक्त 82 सेवा) शस्त्रक्रिया पश्चात सेवांचा (follow up packages) अंतर्भाव आहे.
जननी सुरक्षा योजना – या योजने अंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व अनुसूचीत जाती जमाती मधील ग्रामीण भागातील गरोदर मातांना घरी प्रसुती झाल्यास 500 रुपये व आरोग्य संस्थेत प्रसुती झाल्यास 700 रुपये लाभ देण्यात येतो. शहरी भागातील लाभार्थी महिलेस प्रसुती झाल्यानंतर 600 रुपयांचा लाभ देण्यात येतो. या योजनेमध्ये मान्यता प्राप्त खासगी रुग्णालयात सिझर शस्त्रक्रिया झाल्यास 1 हजार 500 रुपयांचे अनुदान मान्यता प्राप्त खासगी हॉस्पिटलला देय आहे. या मोहिमे अंतर्गत 1 हजार 270 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.
निक्षय पोषण योजना DBT – या योजने अंतर्गत क्षयरोगाच्या रुग्णांना दरमहा 500 रुपये रोख रक्कम दरमहा 6 महिने उपचार घेणाऱ्या लाभार्थ्यांना देण्यात येत असून 147 रुग्णांना याचा लाभ देण्यात येत आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना – ही योजना जिल्ह्यातील गरोदर मातांसाठी राबविण्यात येत आहे. त्यामध्ये कुटुंबातील पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत त्या महिलेला एकुण 5 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य टप्याटप्याने (३ टप्यात ) दिले जाते व कुटुंबातील दुसरे अपत्य मुलगी जन्मल्यास एकुण 6 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेअंतर्गत आज पर्यंत 5 हजार 336 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.
राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रम – या कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर पुरुष शस्त्रक्रिया व स्त्री शस्त्रक्रिया करण्यात येते. यामध्ये पुरुष शस्त्रक्रिया करणाऱ्या लाभार्थ्यांना 1 हजार 450 रुपये व स्त्री लाभार्थीना 250 रुपये लाभ देण्यात येत आहे, अशा एकुण 590 लाभार्थीना लाभ देण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी अभियानाअंतर्गत शासकीय योजनांचा जिल्ह्यातील 31 हजार 161 लाभार्थ्यांना आजवर लाभ देण्यात आला असुन 2 कोटी 72 लाख 26 हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली आहे.