बाळासाहेबांची शिवसेना जळीतग्रस्तांच्या पाठीशी : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर, शिवाजी पार्क परिसरातील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये मंगळवारी लागलेल्या भीषण आगीत २४ झोपड्या जळून खाक झाल्या.बाळासाहेबांची शिवसेना या जळीतग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.या जळीतग्रस्तांचे जीवनमान सुधारण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू, अशी ग्वाही देत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्षराजेश क्षीरसागर यांनी या जळीतग्रस्तांच्या कायमस्वरूपी घराच्या मागणी संदर्भात आणि पुनर्वसनासंदर्भात तातडीची बैठक आयोजित करण्याच्या सूचना यावेळी महापालिका प्रशासनास दिल्या.
शिवाजी पार्क येथील इंदिरानगर झोपडपट्टी येथे मंगळवारी लागलेल्या भीषण आगीत प्रापंचिक साहित्य जळून खाक झालेल्या झोपड्यातील कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. लहान मुलांसह महिला, पुरुष रस्त्यावरच निवारा घेत आहेत. राजेश क्षीरसागर यांनी आज या ठिकाणी भेट देवून पाहणी केली. दुर्घटनाग्रस्त सर्व कुटुंबियांची आपुलकीने विचारपूस करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी सन १९७२ पासून झोपडपट्टी अस्तित्वात असून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून पक्क्या घरांची मागणी यावेळी जळीतग्रस्त कुटुंबीयांनी केली. यासह जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी तात्काळ संपर्क करून मदती संदर्भात तात्काळ आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना केल्या.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, घडलेली दुर्घटना दुर्दैवी आहे. प्राथमिक पाहणीत २४ कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येते. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पंचनामे तयार करण्यात आले असून, मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर शासकीय मदतीप्रमाणे वैयक्तिक स्वरूपातही लवकरच मदत पोहच करू. याशिवाय झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून या जळीतग्रस्तांना कायमस्वरूपी घरे देण्याबाबत बैठक घेवून पक्की घरे बांधून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
यावेळी महापालिका प्रशासनाचे उपायुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जलअभियंता हर्षजीत घाटगे, सोनझारी समाजाचे अध्यक्ष मारुती सोनझारी, शिवाजी सोनझारी, दिलीप सोनझारी, सुभाष सोनझारी, बाजीराव सोनझारी, मा.नगरसेवक आशिष ढवळे, शिवसेना उपशहरप्रमुख विश्वजित मोहिते, मुकुंद सावंत, विभागप्रमुख संदीप चिगरे, शाखाप्रमुख कौस्तुभ उपाध्ये, युवराज देशमुख, विशाल नैनवाणी उपस्थित होते.